- नामदेव मोरेनवी मुंबई : परराज्यातील मजुरांचे स्थलांतर नवी मुंबई महापालिकेच्या पथ्यावर पडले आहे. एक महिन्यापूर्वी मनपाला प्रतिदिन ३७ हजार बेघरांना जेवण पुरवावे लागत होते. सद्य:स्थितीमध्ये हा आकडा १५ हजारांवर आला आहे. मनपाच्या निवारा केंद्रातील संख्या ३६० वरून ४१ झाली आहे.
शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे हजारो मजूर व परराज्यातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. कारखाने बंद झाल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला व निवासाची जागाही सोडावी लागली होती. हॉटेलसह खानावळ बंद झाल्याने जेवण करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. मजुरांनी टेम्पो, ट्रकमधून गावाकडे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. या वेळी मजुरांना महापालिकेच्या निवारा केंद्रात पाठविण्यास सुरुवात झाली. निवारा केंद्रातील व शहरातील बेघरांना जेवण पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर होती.
नवी मुंबई पालिकेने शहरात १८ निवारा केंद्रांचे नियोजन केले. त्यापैकी ६ प्रत्यक्षात सुरू केली. यामध्ये ३६० जणांना आश्रय दिला होता. या सर्वांना चहा, जेवण, नाश्ता मनपाच्या वतीने दिला जात होता. शासनाने परराज्यातील मजुरांना गावी पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर मनपाच्या केंद्रामधील जवळपास ३३९ जण गावी गेले आहेत. सद्य:स्थितीमध्ये मनपाच्या तीन केंद्रांमध्ये फक्त ४१ जण वास्तव्य करत आहेत. यामध्ये बेलापूरमध्ये २३, नेरूळमध्ये ७ व घणसोलीमध्ये १२ जणांचा समावेश आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रुग्णालय तयार केले जात असल्यामुळे तेथील निवारा केंद्र बंद केले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पालिका हद्दीत रोज ३५ ते ४० हजार मजूर, बेघर व गरिबांना अन्नपुरवठा केला जात होता. मनपाच्या १५ कम्युनिटी किचनद्वारे व सामाजिक संस्थांच्या मदतीने हे अन्नदान केले जात होते. २८ एप्रिलला ३७,२४० जणांना जेवण दिले होते. एक महिन्यात मोठ्या संख्येने मजूर गावी गेल्यामुळे २७ मे रोजी फक्त १५,०७२ जणांना जेवण पुरवावे लागले. जवळपास ६० टक्के भार कमी झाला आहे. याशिवाय रस्ते, उड्डाणपुलाखाली, मोकळ्या जागांवर हजारो मजूर वास्तव्य करत होते, त्यांची संख्याही कमी झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.
दाटीवाटीत राहत होते मजूर
परराज्यातील मजूर छोट्या खोलीत व कारखान्यात दाटीवाटीने राहत होते. उड्डाणपुलाखाली, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी आश्रय घेतला होता. सार्वजनिक प्रसाधनगृह व अनेक ठिकाणी उघड्यावर प्रातर्विधी केला जात असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. स्थलांतरामुळे मनपावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
एपीएमसीतील मजुरांचेही स्थलांतर
एपीएमसीतील भाजीपाला व फळ मार्केटमध्ये परराज्यातील कामगारांनी आश्रय घेतला होता. त्यांच्यामुळे मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या महिनाभरात अनेकांनी गावी पलायन केले. ट्रक व टेम्पोतूनही अनेक जण गावी गेले. यामुळे मार्केटवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
महिनाभराचा तपशील प्रकार
२७ मे २८ एप्रिल शहरातील निवारा केंद्रे १८ १८ कार्यान्वित निवारा केंद्रे ३ ६निवारा केंद्रातील आश्रित ४१ ३६०