नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून पुढील शैक्षणिक वर्षात त्या सिडकोच्या ताब्यात देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाने दिले आहेत.स्थलांतरित होणाºया दहा गावांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जात आहे. यापैकी पाच गावे वडघर येथे तर उर्वरित पाच गावांचे वहाळ गाव परिसरात स्थलांतरित करण्यात येत आहेत. ही गावे स्थलांतरित होणार असल्याने येथील शैक्षणिक सुविधाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यानुसार सिडकोने शाळांसाठी ९ भूखंड आरक्षित ठेवले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या विचारात घेवून वडघर आणि वहाळ येथे प्रत्येकी ३000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आरक्षित ठेवून त्यावर शाळेची इमारतही बांधण्यात आली आहे.सध्या गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या गावांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद केल्या जाणार आहेत. तसेच सध्या तयार असलेल्या शाळांच्या इमारतीचा ताबा जिल्हा परिषदेकडून सिडकोकडे दिला जाणार आहे. या शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी सुध्दा सिडकोकडे वर्ग केले जाणार असल्याचे ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या कार्यसन अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
‘त्या’ दहा गावांतील शाळांचे स्थलांतरण, पुढील शैक्षणिक वर्षात सिडकोकडे ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 3:39 AM