बाजरी देतेय मायेची ऊब; थंडी अन् मकर संक्रांतीमुळे वाढली मागणी, भाव नियंत्रणात
By नामदेव मोरे | Published: January 9, 2024 01:01 PM2024-01-09T13:01:14+5:302024-01-09T13:02:08+5:30
कोरोनापासून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती वाढली आहे
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: हिवाळा सुरू झाल्यानंतर उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. वाढलेली थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे. सोमवारी १८५ टन आवक झाली. थंडीमुळे बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत असून, भावही नियंत्रणात आल्यामुळे बाजरीच्या खरेदीत वाढ झाली आहे.
कोरोनापासून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती वाढली आहे. हंगामाप्रमाणे आहारामधील खाद्यपदार्थांमध्ये बदल केला जात आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. मकर संक्रांत व वाढलेली थंडी यामुळे यावर्षीही बाजरीला मागणी वाढली आहे. नियमित १० ते ३० टन बाजरीची आवक होत आहे. थंडी सुरू झाल्यापासून रोज ५० टनापेक्षा जास्त आवक होत आहे. सोमवारी सर्वाधिक १८५ टन आवक झाली आहे. राज्याच्या विविध भागांमधून व इतर राज्यांमधूनही बाजरी विक्रीसाठी येत आहे.
बाजरी खाण्याचे फायदे
बाजरीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरससारखे घटक असतात. रक्तदाब, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठतेसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो. हाडांना मजबुती येते व इतरही औषधी गुण यात आहेत.मेथी वडे व सूप बनविण्यासाठीही वापर केला जातो.
एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती.
आता हे दर २७ ते ३७ रुपयांवर आले आहेत.
किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
ज्वारी व गव्हापेक्षाही बाजरी स्वस्त असल्यामुळे तिला पसंती दिली जात आहे.
अनेक जण बाजरीच्या भाकरीला प्राधान्य दिले जात आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत आहे.
कुठे पिकते बाजरी?
महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे बाजरीचे उत्पादन होते.
देशात राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये बाजरीचे उत्पादन होते. काही प्रमाणात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबमध्येही उत्पादन घेतले जाते.
बाजरीचा वापर- बाजरीची भाकरी, कटलेट्स, खिचडी
बाजार समिती भाव रुपये/किलो
- मुंबई २७ ते ३७
- नंदुरबार २४ ते २५
- नांदगाव २६ ते २६.६०
- चोपडा २५ ते २५.५०
- बीड २४
- पुणे ३३ ते ३५
- देवळा २५ ते २६