थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब

By नामदेव मोरे | Published: January 8, 2024 06:53 PM2024-01-08T18:53:52+5:302024-01-08T18:54:00+5:30

१८५ टन आवक : बाजारभाव नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकांमध्येही समाधान

Millets in the cold and Makar Sankranti season | थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब

थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब

नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. वाढलेली थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे. सोमवारी १८५ टन आवक झाली आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत असून, भावही नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकही बाजरी खरेदीला पसंती देत आहेत.

कोरोनापासून मुंबई, नवी मुंबईकरांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढली आहे. हंगामाप्रमाणे आहारामधील खाद्यपदार्थांमतध्ये बदल केला जात आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. मकर संक्रांत व वाढलेली थंडी यामुळे यावर्षीही बाजरीला मागणी वाढली आहे. नियमित १० ते ३० टन बाजरीची आवक होते. थंडी सुरू झाल्यापासून रोज ५० टनपेक्षा जास्त आवक होत आहे. सोमवारी सर्वाधिक १८५ टन आवक झाली आहे. राज्याच्या विविध भागांमधून व इतर राज्यांमधूनही बाजरी विक्रीसाठी येत आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर २७ ते ३७ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ज्वारी व गव्हापेक्षाही बाजरी स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडूनही बाजरीला पसंती दिली जात आहे.

अनेक घरांमध्ये बाजरीच्या भाकरीला नियमित प्राधान्य दिले जात आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत आहे. याशिवाय बाजरीपासून इतर मेनूही बनविले जात आहेत.

राज्यातील बाजरीचे बाजारभाव
बाजार समिती - भाव
मुंबई - २७ ते ३७
नंदुरबार - २४ ते २५
नांदगाव - २६ ते २६.६०
चोपडा - २५ ते २५.५०
बीड - २४
पुणे - ३३ ते ३५
देवळा - २५ ते २६

कुठे पिकते बाजरी
महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे बाजरीचे उत्पादन होते. देशात राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये बाजरीचे उत्पादन होते. काही प्रमाणात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबमध्येही उत्पादन घेतले जाते.

बाजरी खाण्याचे फायदे
यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे घटक असतात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो. बुद्धकोष्ठता, हाडांना मजबुती व इतरही औषधी गुण यामध्ये असतात.

बाजरीचा वापर - बाजरीची भाकरी, कटलेट्स, खिचडी, मेथी वडे व सूप बनविण्यासाठीही याचा वापर केला जातो.

Web Title: Millets in the cold and Makar Sankranti season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.