तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:32 AM2019-03-25T02:32:59+5:302019-03-25T02:33:17+5:30

तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Millions of liquor seized from the godown in Turbhe | तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल परिसरातून देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
तुर्भे एमआयडीसी येथील साईनाथ ग्रेनाइट या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी गोदामाच्या एका भागामध्ये बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यापैकी काही बॉक्स पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये महागडी दारू आढळली. पोलिसांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये या दारूसाठ्याची किंमत ७३ लाख ६२ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. विदेशी मद्यसाठ्याबाबत पोलिसांनी गोदाम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता, त्याने कस्टमच्या लिलावात हे मद्य खरेदी केल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांनी कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याची पूर्तता होऊ शकली नाही. यानुसार गोदाम मालक आशिष सिंग व कर्मचारी किसन कामकर यांच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी कामकर यास अटक करण्यात आली असून, मालक सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत.
आचारसंहितेच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या विदेशी मद्यसाठ्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून गेल्या १३ दिवसांत नवी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. त्यामध्ये अग्निशस्त्र, तलवार, कोयते यासह गावठी दारू पकडण्यात आली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांचे छापासत्र
कोपरखैरणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ४२० लीटर देशी दारू साठा जप्त केला होता. याशिवाय पनवेल, एपीएमसी व तुर्भे एमआयडीसी परिसरातही अवैध दारूविक्रीच्या धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करून काही जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रत्येक निवडणुकीपूर्वी पोलिसांकडून अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे संकेत असल्याने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवायांवर पोलिसांनी भर दिला आहे. त्याकरिता शहरात कोम्बिंग आॅपरेशन व नाकाबंदी करण्यात येत आहे.

Web Title: Millions of liquor seized from the godown in Turbhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.