- मयुर तांबडेपनवेल : महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीजबिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत.पनवेल-१ उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी सात लाख ७६ हजारांच्या ६४१ ग्राहकांच्या रिसिप्ट रद्द करून महावितरणच्या लाखो रुपयांचा अपहार केला होता.महावितरणकडे लाखो नागरिक आपले वीजबिल भरण्यासाठी येत असतात. नावडे येथील महावितरणच्या कार्यालयात वीजबिल भरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांच्या बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून सिंह यांनी ते पैसे स्वत:साठी वापरले. वीजबिल भरूनदेखील दुसऱ्या महिन्यात ग्राहकाच्या बिलामध्ये मागील थकबाकी आल्याने ग्राहकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले. या वेळी हा प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह याला निलंबित करण्यात आले असून, त्याच्याकडून जवळपास सात लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी दिली. यात आणखी काही अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अद्याप गुन्हा दाखल नाहीवैभव केशवप्रसाद सिंह (सहायक अभियंता) याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर दोषारोप पत्र ठेवून अधीक्षक अभियंता वाशी मंडळ यांच्या नियंत्रणात चौकशी करण्यात येत आहे. या फसवणूक प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वीजबिलांत लाखो रुपयांची हेराफेरी, सहायक अभियंता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:26 AM