पेण : कोकणातील आंबा उत्पादक कृषी उत्पादन व फळपीक उत्पादन विक्रीचे मध्यवर्ती व रायगड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेले पेण शहर भविष्यात आंबा विक्रीचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र म्हणून निवडले जाऊ शकते. यासाठी शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे एकमत झाले असून, याला राजकीय इच्छशक्तीचे पाठबळ मिळण्यास गणेशमूर्ती विक्रीचे केंद्रस्थान म्हणून जगभरात ओळख पटलेल्या पेण शहराला कोकणचा राजा म्हणून गौरविलेल्या हापूस आंबा विक्रीचे मध्यवर्ती व्यापारी केंद्र म्हणून नवी ओळख मिळणार आहे. सध्या पेण शहरात आंबा विक्री करणारे स्थानिक १०० विक्रेते असून, आदिवासी समाजबांधवांसह इतर स्थानिक आंबा उत्पादक गावकरी रोज देवगडचा हापूस व पेण-अलिबागचा आंबा विक्रीतून दररोज एक लाख रुपयांचा व्यवसाय करीत असल्याचे पेण शहरातील प्रमुख आंबा विक्रेते प्रशांत तेलवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.पेणमधील रवीराज फार्महाऊस येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची कृषी फलोत्पादन परिषद संकल्प ग्रामसमृद्धी प्रतिष्ठानतर्फे संपन्न झाली. या परिषदेप्रसंगी कोकण आयुक्त तानाजी सत्रे, रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कोकण उपायुक्त शिंदे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने पेण शहरात देवगडचा हापूस या बरोबरीने अलिबाग, मुरुड व पेणचा स्थानिक बागायतदार यांचा आंबा येतो. पेण शहरातील प्रमुख बाजारपेठ, पेण-खोपोली रस्त्यावरील चावडीनाका तसेच पेण कृषी उत्पन्न बाजार समितीत या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून देवगडचा हापूस पेण शहरात विक्रीसाठी येतो. त्याचसोबत अलिबागचा आंबा मोठ्या प्रमाणात येतो. साधारणपणे पाऊस पडेपर्यंत तीन महिन्यांच्या हंगामात या व्यवसायातून मोठी उलाढाल होते. दररोज एक लाखाच्या आसपास आंब्याची विक्री होते. तर या कालावधीत येणारे सण, उत्सव, ग्रामदैवतांच्या जत्रांप्रसंगी बाहेरून येणारे चाकरमानी पेण शहरातील आंबा मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. गतवर्षी २०१४-१५ मध्ये युरोप खंडातील २८ देशांनी आंबा निर्यात बंद केल्याने आंबा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला होता. मात्र २०१५-१६ पासून ही निर्यात पुन्हा सुरू झाल्याने या आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला. कोकणातील हापूस आंबा एपीएमसी नवी मुंबई, कोल्हापूर व पुणे या ठिकाणी नेला जातो. मात्र यासाठी स्थानिक पातळीवर मध्यवर्ती आंबा विक्री केंद्र उभारल्यास त्याचा प्रत्यक्ष लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळून त्याचं नुकसान टळेल. ७० ते ८० टक्के आंबा याच बाजार समित्यांमध्ये विक्रीस जातो. पिकतो तिथे संपूर्णपणे विकला जावा, यासाठी पेणमध्ये संपन्न झालेल्या कृषी फलोत्पादन परिषदेत जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आंबा विक्री केंद्राची मोठी बाजारपेठ निर्माण करण्याचा संकल्प शेतकरी हिताचा आहे. आंबा विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून पेण शहर साजेस व्यापार केंद्र आहे. (वार्ताहर) पेण शहरात देवगडचा हापूस, अलिबाग व पेणचा लोकल आंबा येतो. येथील व्यापार करणारे संघटित नसल्याने आंब्याच्या विक्रीत चढउतार जाणवतो. पेणमध्ये महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची परिषद झाली, यात तज्ज्ञांनी चांगली माहिती देण्यात आली. पेण शहरात आंबा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र झाल्यास शेतकरीवर्ग व आंबा विक्रेते यांना संघटित करण्यास आमचे सर्वांचे सहकार्य राहील. - प्रशांत तेलवणे, आंबा विक्रेता
आंबा विक्रीतून लाखोंची उलाढाल
By admin | Published: May 10, 2016 2:08 AM