सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मूळ प्रस्ताव आमचाच - मंदा म्हात्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:39 AM2019-06-27T02:39:45+5:302019-06-27T02:40:06+5:30
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे
नवी मुंबई - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे; परंतु महापालिकेच्या या निर्णयाला सत्ताधारी राष्ट्रवादीचा निवडणूक अजेंडा असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मुळात २0१७ मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता दिली होती; परंतु त्याचे श्रेय भाजपला मिळू नये, म्हणून सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षे हा प्रस्ताव अडकवून ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रस्तावाला मंजुरी देऊन सत्ताधाºयांनी राजकीय खेळी केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
निवासयोग्य सर्वोत्कृष्ट शहर म्हणून नवी मुंबईचा गवगवा होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षेविषयक यंत्रणासुद्धा तितक्याच सक्षम असाव्यात, नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, या उद्देशाने महापालिकेने शहराच्या प्रमुख ५३० ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली आहे. शहरवासीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असला तरी यामागील मूळ कल्पना आपली असल्याचे मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.
विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर नवी मुंबईचा लौकिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची सुरक्षाही तितकीच सक्षम असावी, या दृष्टिकोनातून नवी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये नवी मुंबईच्या विविध भागात १४९३ सीसीटीव्ही बसविण्यास मान्यता दिली होती. तशा सूचना महापालिकेला केल्या होत्या; परंतु याचे श्रेय आपणाला मिळू नये, म्हणून सत्ताधाºयांनी दोन वर्षे हा प्रस्ताव बारगळत ठेवला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचाही पलटवार
राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी मंदा म्हात्रे या सीसीटीव्ही कॅमेºयाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याची टीका केली आहे. २०१७ मध्ये नवी मुंबईमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे; परंतु तशी मंजुरी मिळाली होती तर प्रत्यक्ष कॅमेरे का बसले नाहीत, शासनाकडून निधी का आणला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेच्या निधीमधून यापूर्वी २८२ कॅमेरे बसविण्यात आले होते व आता १४३९ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे व महापालिकेचे श्रेय असून आमदारांची श्रेय लाटण्यासाठी धडपड सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.