नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी बोनकोडे गाव येथे छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या दलालाला अटक केली आहे. पोलिसांनी त्या ठिकाणावरून तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. वेश्या व्यवसायासाठी त्यांना एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते.बोनकोडे गावात भाडोत्री घरामध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. वेश्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी काही बांगलादेशी महिलांना डांबून ठेवण्यात आले होते. एक दलाल ग्राहकांचा शोध घेऊन त्या ठिकाणी घेऊन यायचा. अशाप्रकारे मागील काही महिन्यांपासून त्या ठिकाणी हा कुंटणखाना चालवला जात होता. याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांना मिळाली होती. यानुसार उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, व्ही. घोलप, हवालदार व्ही. डी. सापते, एच. बी. शितोळे, अर्चना गोसावी यांचे पथक तयार केले होते. या पथकामार्फत बोनकोडे गाव परिसराची पाहणी करण्यात आली असता, राजेश भगत चाळीतल्या घरात चालणारा हा गैरप्रकार उघडकीस आला. यानुसार तपास पथकाने बनावट ग्राहकाद्वारे खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकला. कारवाईत राकेश झुलेर रॉय या दलालाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वेश्या व्यवसायासाठी त्याने डांबून ठेवलेल्या तीन महिला व एका अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. त्या पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशच्या मूळच्या राहणाऱ्या आहेत. तर अल्पवयीन मुलगी ही बोनकोडे लगतच्याच झोपडपट्टी भागात राहणारी आहे. तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत राकेश रॉय याने तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले होते. महिलांपेक्षा मुलींकरिता ग्राहकांकडून जास्त पैसे मिळत असल्याने त्याने या अल्पवयीन मुलीला देहविक्रीसाठी प्रवृत्त केले होते. या अवैध धंद्याप्रकरणी घरमालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. रॉय याला घर भाड्याने देण्यापूर्वी कोणताही करार करण्यात आलेला नाही. शिवाय त्या ठिकाणी गैरप्रकार चालत असतानाही डोळेझाक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
बोनकोडेतून तीन महिलांसह अल्पवयीन मुलीची सुटका
By admin | Published: February 10, 2017 4:35 AM