कर्जत : नगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईशी भांडण झाले म्हणून १० सप्टेंबर २०१६ रोजी घरातून निघून गेली होती. ती मुलगी १२ मार्च २०१७ रोजी पुन्हा कर्जतमध्ये आली. या दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. या प्रकारणाचा तपास व्हावा, अशी मागणी बालसमितीने पत्रकार परिषद घेऊन केली. गुंडगे येथील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे १० सप्टेंबर २०१६ रोजी गणपती विसर्जनच्या वेळी तिच्या आईशी भांडण झाले म्हणून ती रागावून घराबाहेर पडली. गुंडगे गावातच राहणाऱ्या एका महिलेने याचा फायदा घेऊन तिच्याशी गोड बोलून स्वत:सोबत तिला नेरळ येथे नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. आठ-दहा दिवसांनंतर अल्पवयीन मुलीला गुजरात येथे (मूळ राहणार गुंडगे) खारोड येथे वास्तव असलेल्या ठिकाणी नेले. मुलीला तेथेच सोडून निघून आले. गुजरातमध्ये राहणारी महिला या अल्पवयीन मुलीला देहविक्री करण्यासाठी भाग पाडत असे. दोन महिन्यांनंतर या महिलेने अल्पवयीन मुलीला मारहाण करून एक लाख रु पयाला विकले. मात्र, पुन्हा त्या व्यक्तीने महिलेकडे आणून सोडले. त्यानंतर त्या महिलेने या मुलीला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकले. अखेर ९ किंवा १० मार्च रोजी या सर्व प्रसंगातून तिला बाहेर पडण्यास यश आले. ती गुंडगे येथे आली असता तिचे आईवडील राहत नव्हते. सहा महिन्यांपूर्वी हरवलेली मुलगी पुन्हा घरी आली म्हणून बाजूच्या महिलेने तिला कर्जत पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिची चौकशी करून तिला महिला वसतिगृहात पाठवले. मुलीला १२ मार्चला बाल कल्याण समिती समोर बसवण्यात आले. त्यावेळी पीडित मुलीने वरील घटना सांगितली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दर्जा असलेल्या बाल कल्याण समितीने कर्जत पोलीस ठाण्याला या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी चौकशी करावी असे आदेश दिला. मात्र, १२ ते २३ मार्च या कालावधीत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी काहीच तपास केला नाही. यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी आणि जिल्हा समन्वयक अशोक जंगले यांनी दिशा केंद्रात पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार समोर आणला. (वार्ताहर)कारवाई होत नसल्याने शिवसैनिक आक्रमकच्कर्जत शहरातील गुंडगे येथील मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, तरी कर्जत पोलीस ठाणे तिला खोटे ठरवत आहे, या सर्व घटनेची चौकशी करून बाल कल्याण समिती पोलीस ठाण्याला आदेश देऊनही पोलीस यंत्रणा दहा-बारा दिवसांत काहीच हालचाल करत नाही. पीडित मुलीला न्याय मिळून देण्यासाठी आता शिवसेना पुढे आली आहे. मंगळवारी संध्याकाळी कर्जत तालुक्यातील शिवसैनिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकले. या घटनेतसुद्धा पोलीस निरीक्षक यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटक सुरेखा शितोळे, तालुका प्रमुख संभाजी जगताप आदींसह शिवसैनिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले. यामध्ये त्या पीडित मुलीवर ज्यांनी अत्याचार केले त्यांना तत्काळ अटक करा. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांना तत्काळ निलंबित करावे आदी मागण्या या निवेदनात के ल्या आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Published: March 30, 2017 6:43 AM