ग्रामीण कौशल्य योजनेत ७ कोटींचा अपहार; ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 26, 2022 07:02 PM2022-09-26T19:02:11+5:302022-09-26T19:02:55+5:30
गरजूंना प्रशिक्षण योजनेच्या अटी शर्तींचा भंग
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवताना अटी व शर्तींचा भंग करून ७ कोटी २६ लाखाच्या अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी ठेकेदार विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यासाठी निधी घेऊनही प्रशिक्षण न दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रामीण भागातील १८ ते ३५ वयोगटातील युवक, युवतींना कौशल्यविषय प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवली जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के निधी वापरला जातो. त्यानुसार २०१७ मध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातील तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ठेका सूर्या वायर्स प्रा. लिमिटेड कंपनीने घेतला होता. तर या जिल्ह्यातील एकूण २५०० लाभार्थींना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी शासनाला कळवले होते. यासाठी त्यांना २९ कोटी ४ लाख रुपये दिले जाणार होते. त्यापैकी ७ कोटी २६ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र हि रक्कम केवळ उपक्रमासाठीच वापरण्यासाठी असून ती इतर खात्यात वर्ग न करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. नुकतेच शासनामार्फत या ठेकेदाराकडून ग्रामीण भागातील तरुणांना योग्यरीत्या प्रशिक्षण व रोजगाराची संधी दिली जात आहे का याचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये २०१७ ते २०२१ दरम्यान केवळ ५८८ लाभार्थीना प्रशिक्षण देऊन त्यापैकी केवळ ४० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले.
त्यासाठी फक्त १६ लाख ८४ हजाराचा निधी वापरण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम हि इतर बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या राज्य व्यवस्थापन केंद्राचे उपसंचालक राजेश जोगदंड यांच्याकडे हा अहवाल प्राप्त झाला होता. याद्वारे त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अटी शर्तींचा भंग करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केलं होती. त्याद्वारे सूर्या वायर्स प्रा. लिमिटेडचे संचालक हर्ष अग्रवाल, योगेंद्र भोईर, सुरेंद्रकुमार जैन व अभिषेक पांडे यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर योजनेची अमलबजावणी करताना हा वाद निर्माण झाल्याने याप्रकरणी सूर्या वायर्सने देखील उच्च न्यायालयात अरबीटेशन पिटिशन दाखल केली आहे.