- मधुकर ठाकूर
उरण : उरणमधील एका लादी कारागिराच्या मुलीचा प्रवास मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या अंतिम दिशेने होऊ लागला आहे. लंडनमध्ये २६ मे रोजी होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत लक्ष्मी शर्मा हिची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
राजस्थानमधुन १९८५ साली रोजगारनिमित्ताने आलेला गणेश शर्मा हा सामान्य इसम उरण-मोरा इथे स्थाईक झाला. मिळेल ते मजुरीचे काम करणाऱ्या गणेश शर्मा यांनी लादी कारागिर म्हणून लौकिक मिळविला.लक्ष्मी शर्मा ही त्यांचीच मुलगी. तिचा जन्म आणि शिक्षण उरणमध्येच झाला.नवी मुंबईत सीएचे शिक्षण घेतले. शिक्षणातील हुशारीच्या जोरावर लंडनमध्ये एनएचएस कंपनीत सीए म्हणून नोकरी करीत आहे.डॉक्टर योगेश कौशिक यांच्याशी विवाहबध्द झालेल्या लक्ष्मीने संगीत -नृत्याची धडेही गिरवले आहेत.
विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमात सहभागी होत लक्ष्मीने काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतही केली आहे. अशा या चौफेर व्यक्तीमत्व असलेल्या लक्ष्मीने लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेची येत्या २६ मे रोजी अंतिम फेरी होणार आहे. या अंतिम फेरीसाठी लक्ष्मीची निवड झाली आहे.तिच्या निवडीबद्दल आई-वडिल, निकटवर्तीय काका पाटील आणि विविध स्तरांवरुन शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.