गृहपाठाचे गणित चुकले, विद्यार्थिनीला बांबूने मारले; घणसोलीतील घटना; शिक्षिकेवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:56 AM2023-12-11T11:56:48+5:302023-12-11T11:57:05+5:30
गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने विद्यार्थिनीला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
नवी मुंबई : गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने विद्यार्थिनीला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली येथील खासगी शिकवणीत हा प्रकार घडला आहे.
समृद्धी जगताप (१४) या विद्यार्थिनी सोबत हा प्रकार घडला आहे. ती नववीत शिकत असून घणसोली सेक्टर ५ येथील सना या खासगी शिकवणीला जाते. शिक्षिका शकीला अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. समृद्धीचे गणिताचे उत्तर चुकले होते. यावरून शकीला यांनी बांबू व लाकडी फळीने समृद्धीला बेदम मारहाण केली. यामध्ये तिचा अंगावर ठिकठिकाणी सूज आली असता घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार पालकांना सांगितले.
धाक निर्माण करण्यासाठी मारहाण
खासगी शिकवणी, अंगणवाडी तसेच इतर ठिकाणी यापूर्वी देखील लहान मुलांना अमानुष मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. मुलांवर धाक निर्माण करण्यासाठी खासगी शिकवण्यांमध्ये सर्रास असे मारहाणीचे प्रकार चालू आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज पालकांकडून व्यक्त होत आहे.