मकरसंक्रांतीचा मुहूर्त चुकला; अलिबागचा हापूस वाशीत पाेहोचला, पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 05:59 AM2021-01-24T05:59:14+5:302021-01-24T05:59:32+5:30
शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो
रायगड : अलिबागमधील हापूस आंब्यांची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये रवाना झाला आहे. निसर्गाच्या हेलकाव्यामुळे अलिबागचा हापूस उशिरा आल्याने संक्रांतीचा मुर्हूत मात्र हुकला आहे.
तालुक्यातील हाशिवरे येथील बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी दोन डझन हापूस आंब्यांच्या सहा पेट्या वाशी एमपीएमसी फ्रूट मार्केटमधील व्यापारी रवींद्र जाधव, ऋषिकेश जाधव यांना विक्रीसाठी पाठविल्या आहेत. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करून ‘पूर्ण हंगाम चांगला जाऊ दे’ अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते.
शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो. यंदा मात्र खराब हवामान, अवकाळी पाऊस याचा फटका बसल्याने संक्रांतीचा मुहूर्त चुकला हाेता. थोडा उशिराने जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात हापूस बाजारात दाखल झाला असल्याचे बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी सांगितले, तसेच हा मुहूर्ताचा आंबा असल्याने या आंब्याचे दर ठरविण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वर्षी आंब्याचे उत्पादन कमीच राहणार आहे. वादळात झाडांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्याचबराेबर, खराब हवामान, अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्याचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुहूर्ताचा आंबा बाजारात आला असला, तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला उशीर लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये २५ ते ३० टक्के हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यंदा मात्र हे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.