सुकापूरमधील बेपत्ता मुले बुडाली; नदीत आढळला एकाचा मृतदेह; दुस-याचा तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:33 AM2017-08-29T05:33:55+5:302017-08-29T05:33:59+5:30
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीतील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीतील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रथमेश नानाभाऊ पाटील (६) व मयांक विष्णू अडसूळ (साडेतीन वर्षे) अशी बेपत्ता मुलांची नावे असून, प्रथमेशचा मृतदेह तक्का परिसरातील गाढी नदीच्या किनारी आढळला. दुसºयाचा शोध सुरू आहे.
सुकापूर येथील प्रेरणा सोसायटीत नानाभाऊ पाटील (मूळ-जळगाव) व विष्णू अडसूळ (मूळ-पैठण) कुटुंबीयांसह राहतात. रविवारी प्रथमेश व मयांक अडसूळ हे दोघे खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडले. दुपारी अडीच वाजले तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र ते कुठेही न सापडल्याने अखेर दोघेही हरविल्याची तक्र ार खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली. खांदेश्वर पोलिसांनी संध्याकाळी दोन्ही बालकांचा शोध सुरू केला. पाऊस सुरू असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. सोमवारी सकाळी सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला लाल, काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका मुलाचा मृतदेह नदीतून वाहत जात असल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. तो प्रथमेशचा मृतदेह होता. या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, खांदेश्वरचे पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून दुसºया मुलासाठी शोधमोहीम राबविण्यात आली.
खेळताना हातपाय चिखलात माखल्याने दोन्ही मुले ते धुण्यासाठी नदीवर गेली होती. या वेळी नदीत जाऊ नका, असेही एकाने त्यांना सांगितले. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे ती बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी
एका मुलाचा मृतदेह तक्का परिसरातील नदीत आढळल्यावर दुसºया मुलाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या वेळी जवळपास दोन ते अडीच तास झाले तरी अग्निश्मन दलाच्या बोटीला वेग देण्यासाठी लावण्यात येणारी ओबीयन मशीन चालू झाली नाही.
मशीन सुरू न झाल्याने मशीनविनाच साध्या होडीला लावून बोट पाण्यात सोडण्यात आली. विचुंबे येथील नदीच्या किनारी मशीन चालू करण्यात अडीच तास गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशावेळी सिडकोची अग्निशमन यंत्रणा फोल ठरल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला.