बेपत्ता मुलगी पालकांच्या स्वाधीन
By admin | Published: January 19, 2016 02:26 AM2016-01-19T02:26:31+5:302016-01-19T02:26:31+5:30
सध्या पोलीस खात्यांतर्गत ‘मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील अनेक मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे
पनवेल : सध्या पोलीस खात्यांतर्गत ‘मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील अनेक मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. पनवेल पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे (१५) अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र काही तासांतच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मुलीचा शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
पनवेल इंडस्ट्रीयल परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी शहरातील वीर सावरकर चौक येथे असलेल्या क्लाससाठी घरातून निघाली होती. परंतु ती घरी न परतल्याने तिचे कोणीतरी अपहरण केले असावे, अशी तक्रार तिच्या घरच्यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता मुलीची बॅग मुंबई-पुणे महामार्गावरील चौक फाटा येथे सापडली. पोलीस पथकाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी घरातील वादातून मैत्रिणीच्या घरी गेल्याचे आणि तिथेच राहिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलीला शहर पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले.