निवृत्त शिक्षकांच्या सेवापुस्तिका गहाळ

By admin | Published: July 17, 2015 10:32 PM2015-07-17T22:32:37+5:302015-07-17T22:32:37+5:30

महाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सावळागोंधळाचे किस्से ऐकावयास मिळत असून, त्यावर पंचायत समिती प्रशासनाचा तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांचा कुठलाही वचक

Missing retired teacher's service book | निवृत्त शिक्षकांच्या सेवापुस्तिका गहाळ

निवृत्त शिक्षकांच्या सेवापुस्तिका गहाळ

Next

महाड : महाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सावळागोंधळाचे किस्से ऐकावयास मिळत असून, त्यावर पंचायत समिती प्रशासनाचा तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. या गलथान कारभाराचा फटका सेवानिवृत्त शिक्षकांना बसला असून, ३५ हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिका गहाळ झाल्याने या निवृत्त शिक्षकांना सुधारित निवृत्तिवेतन मिळण्यास विलंब होत आहे. गेल्या वर्षीपासून या निवृत्त शिक्षकांना आपल्या सेवापुस्तिकांबाबत विचारणा करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे खेटे मारावे लागत आहेत.
अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त शिक्षकांना ही निवडश्रेणी मंजूर झाली. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ रायगड जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांनाच संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही निवडश्रेणी मंजूर झाली आहे. महाड गटामध्ये १८६ सेवानिवृत्त शिक्षकांना त्याचा लाभ मिळणार आहे. अनेकांना सुधारित निवृत्तिवेतनाचा लाभ मिळालाही, मात्र यापैकी ३५ हून अधिक निवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिकाच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गहाळ झाल्यामुळे त्यांना या लाभापासून दुर्दैवाने वंचित राहावे लागत आहे.
सर्वसाधारण सेवानिवृत्तीनंतर ही सेवापुस्तिका पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठवली जाते. निवृत्तिवेतन व अन्य सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ती सेवापुस्तिका पुन्हा संबंधित तालुका शिक्षण विभागाकडे पाठवली जाते. परंतु या निवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिका नेमकी कुठल्या स्तरावर गहाळ झाली त्याचा शोध जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. मात्र जोपर्यंत या सेवानिवृत्त शिक्षकांची सेवापुस्तिका सापडत नाहीत, तोपर्यंत त्यांचे सुधारित निवृत्तिवेतन मंजुरीसाठीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे पाठवता येत नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सेवापुस्तिका सापडेपर्यंत या निवृत्त शिक्षकांना निमूटपणे अन्याय सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)

आपल्या संघटनेच्या प्रयत्नामुुुळे सुधारित निवृत्तवेतन श्रेणी मंजूर झाली आहे. मात्र शिक्षण विभागाकडून ३५ जणांची सेवापुस्तिका गहाळ होणे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे या सेवानिवृत्त शिक्षकांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहे.
- श्रीकांत देशमुख, अध्यक्ष,
सेवानिवृत्त शिक्षक संघटना

Web Title: Missing retired teacher's service book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.