नवी मुंबई : सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाला मुस्कान मोहिमेंतर्गत पोलिसांनी शोधून काढले. मुलगा मिळताच आणि त्याच्या तळोजा-कर्नाटक-भिवंडी प्रवासाची माहिती कळताच पालकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तळोजाजवळील पडघा परिसरात राहणाऱ्या श्रीनिवास सिंग यांना चार मुले आहेत. दोन मुले गावी आजी-आजोबांजवळ आणि दोन त्यांच्यासोबत असतात. १६ डिसेंबर २०१४ ला त्यांचा ८ वर्षांचा मुलगा अंकुश अचानक घरातून गायब झाला. आई-वडील गावी पाठविणार असल्यामुळे त्याने घर सोडले व पनवेल ते कुर्ला दरम्यान रेल्वेमार्गावर भटकत राहिला. पालकांनी व पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. हार्बर मार्गावर फिरणारा हा मुलगा अचानक कर्नाटकला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बसला. कर्नाटकमध्ये उतरल्यावर एक महिलेने त्याला आश्रय दिला. परंतु परिसरातील नागरिकांना महिलेचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता अंकुशला पडघा एवढाच पत्ता सांगता आला. कर्नाटक पोलिसांनी या मुलाला भिवंडी बालसुधारगृहामध्ये पाठविले. तेथील पोलिसांनी ठाणे जिल्ह्णातील पडघा परिसरात फिरविले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुस्कान मोहिमेंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी भिवंडी बालसुधारगृहामधील मुलांची माहिती घेतली. या मुलाने पडघा हा पत्ता सांगितल्यामुळे तळोजामधील पडघा परिसरातील एक मुलगा जवळपास ७ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर त्याची ओळख पटली. पालकांना भेटून मुलगा सापडल्याचे सांगितले. पालकांनी मुलाला ओळखले. मुलगा पुन्हा भेटेल अशी अपेक्षा त्यांना राहिली नव्हती. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांनाही पालकांनी, ‘मॅडम तुम्ही देव आहात,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. पालकांची स्थिती पाहून पोलिसांनाही अश्रू आवरता आले नाहीत. (प्रतिनिधी)कानडी भाषाही शिकलाघरातून पळून गेल्यानंतर अंकुशने रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागून पोट भरले. कुठे जायचे हे न समजल्यामुळे कुर्ला ते पनवेल असा प्रवास तो काही दिवस करत राहिला. एक दिवस एक्स्प्रेसमध्ये बसला व थेट कर्नाटकला पोहचला. एका महिलेने त्याला आश्रय दिला. त्याचा सांभाळही केला. काही महिने तेथे राहिल्यानंतर तो कानडी भाषाही शिकला. हिंदीबरोबरच कानडीमध्येही चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सात महिन्यांनी सापडला बेपत्ता मुलगा
By admin | Published: July 17, 2015 2:51 AM