महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांमध्ये झाल्या चुका, इच्छुकांची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:28 AM2021-02-18T06:28:23+5:302021-02-18T06:28:37+5:30
Navi Mumbai : प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे मंगळवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार वास्तव्य एका प्रभागात करीत आहेत व त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून एक आठवड्यात याद्यांमधील त्रुटी शोधून सूचना व हरकती दाखल करण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे.
प्रारूप मतदार याद्यांकडे सर्वच शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. महानगरपालिकेने निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे मंगळवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु प्रारूप याद्या तयार करताना फारसे परिश्रम घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. अंदाजे मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत.
यामुळे अनेक प्रभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सानपाडामधील एका प्रभागातील जवळपास एक हजार मतदार दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आले आहेत. बेलापूर, सीवूड व इतर परिसरामध्येही अशाच प्रकारे त्रुटी आढळू लागल्या आहेत.
मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. मंगळवारपासूनच अनेकांनी याद्यांमधील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली आहे. मुदतीमध्ये सूचना व हरकती दाखल करण्यात येणार असल्याचे अनेकांनी सांगितले.
आरक्षणावर २३ फेब्रुवारीला सुनावणी
महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये पक्षपातीपणा झाल्याचा व नियमबाह्यपणे कामकाज केल्याचा आक्षेप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी घेतला आहे. याविषयी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी यावर सुनावणी होणार होती. परंतु निवडणूक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे २३ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे. या याचिकेवर काय निर्णय होणार, यावर अंतिम मतदार यादी व निवडणूक होणार की नाही, हे ठरणार आहे.