प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची नामुष्की
By admin | Published: June 28, 2017 03:35 AM2017-06-28T03:35:18+5:302017-06-28T03:35:18+5:30
महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरोलीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे.
शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.