नवी मुंबई : घणसोली येथील मटणविक्रेत्याच्या हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केवळ हत्येच्या उद्देशाने तो मूळ गावावरून परत मुंबईला आला होता. काम करत असलेल्या मटणविक्रीच्या दुकानात मित्राने गल्ल्यापासून लांब केल्याच्या रागातून त्याने त्याची हत्या करून पळ काढला होता. ३ मार्च रोजी घणसोली येथे रईस रसूल बक्श (२५) याची अज्ञात कारणावरून हत्या झाली होती. तो मटणविक्रेते भगवान जाधव यांच्याकडे कामाला होता. रईस हा राहत्या घरात झोपला असता, साथीदाराने त्याची गळा चिरून हत्या करून पळ काढला होता. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक निरीक्षक संतोष कोतवाल यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. रबाळे पोलिसांच्या पथकाने २० दिवसांत गुन्हा उघड करून एकाला अटक केली आहे.मोहम्मद इरफान मोहम्मद जालीम कुरेशी (२५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा उत्तरप्रदेशचा राहणारा आहे. मयत रईस व मोहम्मद दोघेही एकाच गावचे असल्याने त्यांची पूर्वीची ओळख होती. मोहम्मद हा नोकरीच्या शोधात असताना रईसनेच त्याला स्वत: काम करत असलेल्या ठिकाणी भगवान जाधव यांच्या दुकानावर नोकरी मिळवून दिली होती. घटनेच्या काही दिवसअगोदर ग्राहकाकडून आलेले शंभर रुपये ठेवण्यासाठी मोहम्मद गल्ल्याजवळ गेला होता. या वेळी रईस याने त्याला हटकून गल्ल्याजवळ न जाण्यास बजावले. त्यानंतर काही दिवसांतच दुकानमालक जाधव यांनी मोहम्मदला नोकरीवरून काढल्यानंतर तो मूळ गावी निघून गेला. परंतु गावी गेल्यानंतरही रईसचा बदला घेण्याची सूडभावना निर्माण झाली होती. त्याकरिता मुंबईला परत येऊन होळी करून परत जाणार असल्याचे रईसला सांगून त्याच्याकडेच राहिला. अवघ्या दोनच दिवसांत संधी साधून रात्रीच्या वेळी झोपलेले असताना त्याने रईसची गळा चिरून हत्या केली होती. अखेर तो वाराणसी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच सहायक निरीक्षक कोतवाल यांच्या पथकाने त्याला अटक केली. (प्रतिनिधी)
सूड भावनेतून केली मित्राची हत्या
By admin | Published: March 25, 2017 1:42 AM