माथाडी कामगारांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:27 AM2020-02-27T04:27:52+5:302020-02-27T04:28:29+5:30
भाजी मार्केट सुरळीत सुरू; धान्य, मसालासह कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट
नवी मुंबई : प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. कांदा, मसाला व धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदवरून माथाडी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.
राज्यातील माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डांची पुनर्रचना करण्यात यावी. बोर्डांवर पूर्ण वेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. कर्मचारी भरती करण्यात यावी, घरांसह पतसंस्था, रुग्णालय व इतर प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या मुख्य संघटनेने २६ फेब्रुवारीला राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते.
यापूर्वी माथाडी संघटनेने बंद पुकारल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात यायचा; परंतु या वेळी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आंदोलनावरून एकवाक्यता दिसली नाही. यामुळे बंद असूनही भाजी मार्केट सुरळीत सुरू होते. भाजी मार्केटमध्ये ५८४ वाहनांची आवक झाली असून, २५७ वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये १५८ वाहनांची आवक झाली व ७४ वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये दुपारनंतर व्यवहार बंद करण्यात आले.
मसाला, धान्य व कांदा या तीन मार्केटमधील व्यवहार जवळपास ठप्प होते. रेल्वे धक्का व इतर ठिकाणचे व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते. पुणे, नाशिक, सातारा व इतर काही जिल्ह्यांमधील काही मार्केटही बंद ठेवण्यात आली होती.
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदची दखल शासनाने घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये तातडीची बैठक आयोजित केली असून, त्या बैठकीमध्ये माथाडींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांनी पुकारलेल्या बंदला भाजीपाला मार्केट वगळता इतर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.
- नरेंद्र पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चर्चा करून दोन महिन्यांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठकीचे आयोजन केले असून, सरकारकडून कामगारांचे सर्व प्रश्न सोडवून घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन