एमजेपी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:11 PM2019-06-18T23:11:58+5:302019-06-18T23:12:11+5:30
कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी
पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जेएनपीटी पाणीपुरवठ्याची टप्पा १ ही योजना सुरू केली. या योजनेतून जेएनपीटीसह पनवेल, कळंबोली, खारघर, तळोजा आदी अनेक भागात पाणीपुरवठा करण्यात येतो.
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात ३६ कामगार काम करतात, तर या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम २४ कामगार काम करतात. मात्र, २६ वर्षांहून जास्त काळ लोटल्यानंतरही या कामगारांना सेवेत पूर्णवेळ सामावून घेतले गेले नसल्याने कामगारांनी सोमवारी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मंगळवारी दुसºया दिवशीही हे आंदोलन सुरूच होते.
२००८ पर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांचा ठेकेदार हे काम सोडून गेल्यानंतर याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भोकरपाडा ते कळंबोली, जेएनपीटीपर्यंतची देखभाल करण्यात येते आहे; परंतु ठेकेदार नसल्यामुळे एमजेपीकडून थेट बँकेत या कर्मचाºयांना पगार दिला जातो. कंत्राटी कामगार म्हणून एमजेपीकडून पगार दिला जात असल्यामुळे भविष्यात एमजेपीत कायमस्वरूपी नोकरी मिळेल, अशी आशा या कर्मचाºयांना होती. मात्र, वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय झालेला नाही. २०१४ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करूनही काही तोडगा निघाला नाही. तत्कालीन आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली युनियनच्या माध्यमातून एमजेपीकडे पाठपुरावा करूनही या कामगारांचा पगारदेखील वाढला नाही. सर्व प्रकारचे मार्ग अवलंबूनही यश मिळत नसल्याने या कर्मचाºयांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पनवेल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. कामगारांना पाठिंबा देण्यासाठी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, उपोषणाला बसलेल्या ४७ वर्षीय वामन पडवळ यांची प्रकृती दुसºया दिवशी खालावली होती. एमजेपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अर्धा तास चाललेली ही चर्चा शेवटी निष्फळ ठरली, त्यामुळे कामगार उपोषणावर ठाम आहेत.