योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्र ज्युडिशियरी परीक्षा (एमजेएससी) साठी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील परीक्षा केंद्रावर आलेल्या सुमारे ८ उमेदवारांना रिपोर्टींग वेळेपेक्षा दोन मिनिटे उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही. विनवण्या करूनही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सीबीडीतील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या परीक्षा केंद्रावर शनिवारी महाराष्ट्र ज्युडिशियरी प्राथमिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला राज्यातील विविध जिल्ह्यातील उमेदवार सहभागी झाले होते. सीबीडी विभागात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दोन शाळा आहेत. गुगल मॅपवरून काही विद्यार्थी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेत पोहचले. त्याठिकाणी पोहचल्यावर या शाळेत परीक्षा केंद्र नसून परीक्षा केंद्र असलेली शाळा सुमारे दिड किलोमीटर अंतरावर असल्याचे समजताच विद्यार्थ्यांची धावपळ झाली. परीक्षेचा रिपोर्टींग टाइम ९ वाजून ३० मिनिटे तर परीक्षेची वेळ १० वाजताची होती. काही विद्यार्थी ९ वाजून ३२ मिनिटांनी पोहचले मात्र त्यावेळीउ प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. प्रवेशद्वारावर असलेले अधिकारी आणि पोलिसांना विद्यार्थी आणि पालकांनी विनंती करूनही या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यामुळे सुमारे ५ मुली आणि ३ मुले असे सुमारे ८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
एकाच नावाच्या दोन शाळा असल्याने परीक्षा केंद्राबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. परीक्षेसाठी हे विद्यार्थी राज्यातील विविध जिल्ह्यातून आले होते. रिपोर्टींग टाइमच्या दोन मिनिटे उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. यासाठी आम्ही विनंती देखील केली मात्र संबंधित अधिकारी प्रवेशद्वारावर न आल्याने प्रवेशद्वार उघडले नाही. -चेतन पालांडे, पालक