भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 14, 2023 06:31 PM2023-04-14T18:31:23+5:302023-04-14T18:31:52+5:30
मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
नवी मुंबई : मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा आहे. त्यामुळे शिंदे गटाचा कार्यक्रम देखील भाजपच करेल असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. तसेच अयोध्येत जस पहिल्यांदाच राम जन्मला व हेच पहिल्यांदा गेल्याचे दर्शवले जात असल्याचीही टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली. घणसोली येथे फिरत्या शाखेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे घणसोली उपविभाग प्रमुख राजू गावडे, उपविभाग संघटिका शृंखला गावडे यांच्या संकल्पनेतून फिरती शाखा सुरु करण्यात आली आहे. त्याच्या लोकापर्ण प्रसंगी गुरुवारी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यात एकीकडे शाखा पळवल्या जात असताना दुसरीकडे फिरत्या शाखेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अनोख्या शाखेचे कौतुक त्यांनी केले. मात्र शाखा पळवणाऱ्या गाडीतली शाखा पळवायला देखील कमी करणार नाहीत असा टोला देखील भास्कर जाधव यांनी कार्यक्रमप्रसंगी मारला. परंतु ज्यांच्यासोबत मैत्री करायची, त्यालाच पहिलं संपवायची भाजपची परंपरा आहे.
त्यामुळे शिंदे गटाचा कार्यक्रम देखील भाजपच करेल असाही टोला त्यांनी मारला. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याचा दिखावा अशाप्रकारे केला, जसे तेच पहिले अयोध्येला गेलेत व त्याच दिवशी राम जन्माला आलेत अशीही टीका त्यांनी केली. सध्या सरकार पोलिसांना हाताशी धरून शिवसेनेच्या शाखा बळकावत आहेत, खोटे गुन्हे दाखल करत आहेत, धनुष्य चोरत आहेत. मात्र शिवैनिकांचे विचार कसे चोरणारा असेही त्यांनी फटकारले. भाजप विरोधात राज्यात सर्व पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही निवडणुका लागल्या तरी जनता भाजपला व शिंदे गटाला घरी बसवणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाची टिका करूनही काँग्रेसने सुडाचं राजकारण केलं नाही. मात्र भाजप सत्तेत येताच खरे आरोप केले तरी खोटे गुन्हे दाखल होतात अशी टिका करून त्यांनी अप्रत्यक्ष राहुल गांधींवरील कारवाईची खंत व्यक्त केली.
याप्रसंगी खासदार राजन विचारे यांनी देखील सरकारच्या कट कारस्थानांवर संताप व्यक्त करत ठाणेत जिथे जिथे शाखा बळकावल्या गेल्या, तिथे नव्या शाखा तयार झाल्याने शाखा बळकावायचेच प्रयत्न त्यांनी सोडून दिल्याचेही सांगितले. कार्य्रक्रमास जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, माजी नगरसेवक मनोहर मढवी, मनोज हळदणकर, प्रवीण म्हात्रे शुभांगी रावखंडे, राजू गावडे, शृंखला गावडे, आत्माराम सणस आदी उपस्थित होते.