बेलापूर किल्ला-उरण हायवेवरील अपघाताचे विधीमंडळात पडसाद; भुयारी मार्ग विकसित करण्याची मंदा म्हात्रे यांची मागणी
By योगेश पिंगळे | Published: December 20, 2023 05:20 PM2023-12-20T17:20:34+5:302023-12-20T17:20:42+5:30
बेलापूर किल्ला ते उरण हायवे येथील उड्डाणपुलाखालून हलक्या वाहनांसह मालवाहू जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
नवी मुंबई : महापालिका मुख्यालयासमोरील बेलापूर किल्ला-उरण हायवे येथे उड्डाणपूल असून गावातील असंख्य नागरिक उरण व वाशी येथे कामानिमित्त जाण्याकरिता त्या रस्त्याचा वापर करतात. रस्ता ओलांडतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा यासाठी बेलापूर किल्ला - उरण हायवे येथील उड्डाणपुलाखालून भुयारी मार्ग बांधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला सूचित करावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली.
बेलापूर किल्ला ते उरण हायवे येथील उड्डाणपुलाखालून हलक्या वाहनांसह मालवाहू जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. स्थानिकांना कामानिमित्ताने ये-जा करताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना अनेक वेळा अपघात घडले आहेत. १७ डिसेंबर रोजी रात्री रस्ता ओलांडताना बेलापूर गावातील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती म्हात्रे यांनी सभागृहात दिली. यामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा यासाठी बेलापूर किल्ला ते उरण हायवे पुलाखालून भुयारी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या भुयारी मार्गाचा महिला, ज्येष्ठ नागरिकांसह वाशी येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता बेलापूर किल्ला ते उरण हायवे पुलाखाली भुयारी मार्ग करण्याची गरज असल्याचे सांगून तो झाल्यावर रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार असून वेळेची बचत होणार आहे. यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेला द्यावेत असे त्या म्हणाल्या.