मुंबई : पनवेलचे भाजपाचे आमदार प्रशांत राम ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पैशाची पाकिटे घेऊन जाणारी त्यांची प्रचाराची गाडी मध्येच पकडली गेल्याने त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.आमदार ठाकूर यांची निवडणूक रद्द करावी यासाठी शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील ऊर्फ बाळूशेठ यांनी निवडणूक याचिका केली होती. त्यात ठाकूर यांनी मतदारांना लाच दिली, असा एक मुद्दा होता. न्या. सुभाष गुप्ते यांनी ही याचिका फेटाळताना म्हटले की, पाटील यांनी केलेले आरोप आणि त्याच्या पुष्ठ्यर्थ सादर केलेले पुरावे यांचा साकल्याने विचार केला तर आमदार ठाकूर यांनी मतदारांना प्रत्यक्षात लाच दिली असा निष्कर्ष काढता येत नाही. पाटील यांचे सर्व म्हणणे खरे मानले तरी ठाकूर यांनी मतदारांना लाच देण्याची तयारी केली होती. परंतु त्यांचा हा प्रयत्न सफल होऊ शकला नाही, असे फार तर म्हणता येईल.पाटील यांच्या आरोपानुसार आमदार ठाकूर यांच्या प्रचारासाठी वापरली जाणारी एक स्कॉर्पिओ मोटार मतदानाच्या काही दिवस आधी खारघर पोलिसांनी पकडली होती. ही मोटार ठाकूर यांच्या वडील व भावाच्या मालकीच्या मे. ठाकूर इन्फ्रा प्रॉजेक्ट््स या कंपनीच्या मालकीची होती. या मोटारीत ठाकूर यांचे प्रचारसाहित्य व मतदारांच्या नावाच्या स्लीपखेरीज प्रत्येकी ५०० रुपये भरलेली ५०० पाकिटे मिळाली होती. यावरून ठाकूर यांनी मतदारांना लाच दिली याबद्दल त्यांची निवडणूक रद्द करावी, अशी पाटील यांची मागणी होती.ठाकूर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या सर्व मालमत्तांची खरी आणि संपूर्ण माहिती दिली नव्हती. आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज वैध ठरवून स्वीकारला. या मुद्द्यावरही अरुण दत्तात्रय सावंत यांच्या याचिकेवर आमदार किसन कथोरे यांची २००४ च्या निवडणुकीत अंबरनाथ मतदारसंघातून झालेली निवडणूक जशी रद्द केली गेली होती तशीच ठाकूर यांचीही निवडणूक रद्दकरावी, असेही पाटील यांचे म्हणणे होते. न्या. गुप्ते यांनी हे मुद्देही फेटाळून लावले.या सुनावणीत याचिकाकर्ते पाटील यांच्यासाठी अॅड. सी. जी. गावणेकर व सुहास देवकर यांनी तर आमदार ठाकूर यांच्यासाठी ज्येष्ठ वकील मुकेश वशी व अॅड. सचिन शेट्ये यांनी काम पाहिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:31 AM