पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या प्रशासनाविरुध्द पालकांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. गुरुवारी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर व नेते बबन पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी उपोषणाला बसलेल्या मनीषा पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारकडून फीवाढ रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशाला शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. या प्रशासनावर जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे व तत्कालीन गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी लिखित आश्वासन देऊनही कारवाई केली नाही. त्यामुळे राजेंद्र निंबाळकर, मनीषा पाटील, भारत जाधव, राजश्री निंबाळकर, राजेंद्र सालियन व अतुल पवार हे पालक आमरण उपोषणाला बसले आहेत. आम्हाला केवळ मौखिक आश्वासन नको तर आता कारवाई हवी, त्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार या पालकांनी केला आहे. गुरुवारी शाळेच्या मुख्याध्यापिका सईदा यांनी दुपारी ३ वाजता उपोषणस्थळी येऊन पालकांची भेट घेतली आणि शाळा अथवा फी वाढीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे पालकांना सांगितले. यावेळी पालकांनी, तुम्हाला अधिकार नसल्याने तुमच्याशी चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले. सेनेचे आमदार मनोहर भोईर व बबन पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. गटशिक्षण अधिकारी माधुरी कुबेरकर याही यावेळी उपस्थित होत्या. आमदारांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधून शिक्षण शुल्क समितीची बैठक दोन दिवसांत लावण्यास संगितले. शाळेत ८,६०० विद्यार्थ्यांसाठी केवळ ७२ शिक्षक आहेत. अल्पसंख्याक गटासाठी म्हणून शाळा सुरू करून सवलतीत सरकारी भूखंड घेतात, मात्र शासकीय नियम पाळले जात नाहीत. शाळेत राष्ट्रपुरुषांचे फोटो मागे, तर पिंटो कुटुंबीयांचे मोठे फोटो पुढे लावले असल्याचेही पालकांनी निदर्शनास आणून दिले. (वार्ताहर)
उपोषणकर्त्या पालकांची आमदारांनी घेतली भेट
By admin | Published: February 18, 2017 6:37 AM