- नामदेव मोरे, नवी मुंबई भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज वाया जाणारे १० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्यात महापालिकेला यश आले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शहरातील ५० हजार नागरिकांना पाणी पुरविणे शक्य झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे स्वत:चे धरण असतानाही शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील साठा कमी झाला असल्याचे सांगितले जात असले तरी ते वास्तव नाही. पाणीपुरवठा विभागाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या उधळपट्टीवरून टीका होत असताना शहर अभियंता विभागाने दूरदृष्टी दाखवून रोज १० दशलक्ष लिटर पाणी वाचविले आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मोरबे धरणातून येणाऱ्या पाण्यावर भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर गाळ असलेले १० एमएलडी पाणी रोज सोडून द्यावे लागत होते. ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी वाया जात असल्याने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता मोहन डगावकर व मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता जसवंत मिस्त्री यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून या केंद्रात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे शक्य झाले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने अनेक नागरिकांना एक घागर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. अशा स्थितीमध्ये पालिकेने रोज १० एमएलडी पाणी वाचविण्याची यंत्रणा कार्यान्वित केल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकी विभागाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर केला आहे. अशाप्रकारे यंत्रणा राबविणारी व प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी पहिलीच पालिका आहे. याशिवाय महापालिकेच्या मुख्यालयामध्येही पाणी बचतीसाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मुख्यालयामध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा परिसरातील उद्यान, वृक्ष व कारंजासाठी वापर केला जात आहे. याशिवाय मुख्यालयातील वॉश रूममध्ये फ्लशसाठीही याच पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे अनावश्यक गोष्टींसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळता येवू लागला आहे. याशिवाय येथे बायोगॅस प्रकल्पही सुरू केला आहे. मुख्यालयाच्या कँटीनमधील कचरा व सांडपाण्यापासून बायोगॅस तयार होत आहे. हा गॅस कँटीनमध्ये स्वयंपाकासाठी उपयोगात येवू लागला आहे. मुख्यालयात कचऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे रोज दोन ते अडीच तास पुरेल एवढी गॅसनिर्मिती होत आहे. अभियांत्रिकी विभागाने राबविलेल्या या उपक्रमांचे इतर महापालिकांनी व शहरातील मॉल्स, हॉटेलचालकांनी अंमलबजावणी केली तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मॉल्ससह हॉटेलना सक्ती करावीपालिका मुख्यालयात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. बायोगॅस प्रकल्पही उभारला आहे. मुख्यालयापेक्षा कित्येक पट जास्त पाणी मॉल्स व मोठ्या हॉटेलना लागत आहे. कचराही मोठ्या प्रमाणात निघत असून पालिकेप्रमाणे बायोगॅस प्रकल्प व प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वॉशरूम, गार्डन व इतर गोष्टींसाठी वापर करावा, अन्यथा संबंधितांचा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे. महापालिका मुख्यालयातील सांडपाण्यावर याच ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्यान, वॉशरूमसाठीही याच पाण्याचा वापर केला जात आहे. याशिवाय येथे उभारलेल्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस कँटीनला दिला जात आहे. - मोहन डगावकर, शहर अभियंता, महापालिकाभोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज १० एमएलडी पाणी सोडून द्यावे लागत होते. आधुनिक तंत्राचा वापर करून या पाण्यावरही प्रक्रिया करून त्याचा वापर सुरू केला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी ६ कोटी रूपये खर्च आला आहे. परंतु त्यामुळे पालिकेचे रोजचे ८० हजार रूपये वाचू लागले आहेत. रोज ५० हजार नागरिकांना पुरेल एवढे पाणी उपलब्ध झाले आहे. - जसवंत मिस्त्री, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण
मनपा रोज वाचविते १० दशलक्ष लिटर पाणी
By admin | Published: March 30, 2016 1:54 AM