नवी मुंबई मनपाची उंदरांना पकडण्यासाठी मोहीम, 8 महिन्यात पकडले 1 लाख उंदीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 10:41 AM2018-03-07T10:41:53+5:302018-03-07T10:41:53+5:30
उंदरांना पकडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नवी मुंबई- उंदरांना पकडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत एक लाखांहून अधिक उंदीर मारले आहेत. आठ महिन्यांमध्ये महापालिकेने मोहीमेअंतर्गत एक लाखाहून जास्त उंदीर पकडले.
उंदरांमुळं अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजारही होऊ शकतात. नागरिकांच्या आरोग्याला असलेल्या धोका लक्षात घेत महापालिकेनं उंदीर मारण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आठ महिन्यांत १ लाख ९ हजार २१३ उंदीर मारले आहेत. यानुसार रोज जवळपास ४५० उंदीर मारले जात आहेत. नवी मुंबईतही उंदरांचा सुळसुळाट आहे. आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात १ हजार २११ उंदीर मारले आहेत.
महापालिकेचे कर्मचारी आधी उंदरांची ठिकाणं शोधून काढतात. त्यानंतर तेथे विशेष खूण केली जाते. ज्या ठिकाणी उंदीर मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे विषारी गोळ्या ठेवल्या जातात. या गोळ्या खाल्ल्यानं उंदीर मरतात. याशिवाय नागरिकांकडून तक्रारी मिळाल्यानंतरही त्या-त्या विभागात जाऊन अधिकारी उंदीर मारण्याची औषध टाकतात.
उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेचे कर्मातारी अॅल्युमिनियम फॉस्फाइट, जिंक फॉस्फाइट, ब्रोमेडिओलॉनी केक यांसारख्या औषधांचा वापर करतात. या औषधांना केकमध्ये टाकून उंदीर असलेल्या स्थानांवर ठेवलं जातं. याशिवाय उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा, ग्ल्यूटेप आणि औषधयुक्त धुराचा शिडकावही केला जातो.
उंदीर मारल्याची विभागवार आकडेवारी
दिघा- 11 हजार 499
ऐरोली- 14 हजार 350
घणसोली- 12 हजार 080
कोपरखैरणे- 16 हजार 609
तुर्भे- 8 हजार 895
वाशी- 14 हजार 921
नेरूळ- 15 हजार 399
बेलापूर- 14 हजार 249
मनपा मुख्यालय- 1 हजार 211