महाराष्ट्र भवनवरून मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:51 AM2018-05-02T03:51:57+5:302018-05-02T03:51:57+5:30
वाशीत आरक्षित भूखंडावर मनसेतर्फे कुदळ मारण्यात आली. सिडकोच्या उदासीनतेमुळे १५ वर्षांपासून महाराष्ट्र
नवी मुंबई : महाराष्टÑ भवनसाठी वाशीत आरक्षित भूखंडावर मनसेतर्फे कुदळ मारण्यात आली. सिडकोच्या उदासीनतेमुळे १५ वर्षांपासून महाराष्टÑ भवन उभारण्यात आलेले नाही. याचा निषेध व्यक्त करत महाराष्टÑ दिनाच्या निमित्ताने मनसेने या कामाला सुरुवात केली आहे.
सिडकोने वाशी सेक्टर ३० अ येथे महाराष्टÑ भवनसाठी भूखंड आरक्षित ठेवलेला आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षात या आरक्षित भूखंडावर महाराष्टÑ भवनचे प्रत्यक्षात कसलेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हा भूखंड खासगी विकासकाच्या घशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यास विरोध दर्शवत आरक्षित भूखंडावरच महाराष्टÑ भवन उभे राहावे, अशी मागणी नवी मुंबई मनसेतर्फे लावून धरण्यात आली आहे. परंतु निवेदने देऊनही सिडको प्रशासन दाद देत नसल्याचा संताप व्यक्त करत काही दिवसांपूर्वीच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी महाराष्टÑ दिनी मनसेतर्फे महाराष्टÑ भवनच्या कामाला सुरुवात केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी महाराष्टÑ दिनाच्या औचित्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आरक्षित भूखंडावर कुदळ मारून महाराष्टÑ भवनच्या कामाला सुरुवात केली. याप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, विनोद पार्टे, डॉ. आरती धुमाळ, गायत्री शिंदे, अनिथा नायडू, विलास घोणे, विनायक पिंगळे, प्रेम जाधव आदी उपस्थित होते.