मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:14 PM2020-08-28T23:14:46+5:302020-08-28T23:14:55+5:30
७८.६६ मिमी पावसाची नोंद
नवी मुंबई : एसटीमधून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नाही, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक जिल्ह्यांच्या सीमांवर ई-पास तपासणी करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन केलेल्या सर्वसामान्यांची जाचक अटींतून सूटका करावी आणि प्रवासासाठी ई-पास तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी दुपारी ऐरोली टोल नाक्यावर ई-पासची होळी करून आंदोलन करण्यात आले. टोल नाके, सीमानाके किंवा तपासणी नाके येथे कोणत्याही पासची तपासणी केली जात नाही, मग प्रवासासाठी ई-पासची सक्ती कशासाठी, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ई-पासची होळी करून आंदोलन केले. यावेळी आंदोलनात प्रसाद घोरपडे, धनंजय भोसले, नितीन लष्कर, चंद्रकांत महाडिक, भूषण आगिवले आदी उपस्थित होते.