नवी मुंबई : मनसे शहर प्रमुख गजानन काळे याने महानगरपालिकेच्या ठेकेदार व प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व उठाबशा काढण्याची धमकी दिल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे शहरातील प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेवून मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयावर धडक दिली. महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी संघटनांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सीवूडमध्ये सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. कामाच्या ठिकाणी जावून ठेकेदाराला व मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोण आहे तो इंजीनीअर त्याचे तर मी कानफाड फोडेल. त्या संजय पाटील ला बोलवा त्याला उठाबशा काढायला लावा. माती तोंडावर टाका. काम तत्काळ थांबवा असे सांगत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी व ठेकेदारांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. गुरूवारी मनसेच्या सीवूड कार्यालयावर धडक देवून या घटनेचा जाब विचारला व निषेध व्यक्त केला.
या घटनेचे पडसाद महानगरपालिकेच्या वर्तुळामध्येही उमटले आहेत. अशा प्रकारे महानगरपालिकेच्या ठेकेदार, अधिकारी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे योग्य नाही. या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिकारी ठेकेदारांना धमकावण्याच्या घटना थांबल्या नाहीत तर काम करणे अशक्य होईल अशी भूमिका घेतली आहे.
श्रमिक सेनेने केला निषेध
नवी मुंबई महानगरपालिकेमधील श्रमिक सेना संघटनेनेही महानगरपालिकेच्या अभियंत्यांना शिवीगाळ केल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी काळ्या फित लावून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा छळ केला जावू नये असेही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र कर्मचारी युनियनही आक्रमक
महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, त्यांना धकमी देणे योग्य नाही. काही आक्षेप असल्यास तो सनदशीर मार्गाने नोंदविणे शक्य आहे. धमकी देणे व शिवीगाळ करण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसीकतेवर परिणाम होतो अशी भुमीका घेतली आहे.
गजानन काळे यांनी व्यक्त केली दिलगीरी
प्रकल्पग्रसत आक्रमक झाल्यानंतर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कामातील त्रुटी दाखविण्याचा होता. प्रकल्पग्रस्त बांधवांमुळे नवी मुंबई शहर विकसित झाले आहे. कालची घटना कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी होती. तरीही अनवधाराने प्रकल्पग्रस्त बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगीरी व्यक्त करतो असे काळे यांनी स्पष्ट केले आहे.