नवी मुंबई : महाराष्ट्र भवनच्या प्रश्नावरून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोत घुसून हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे’, अशा घोषणा देत व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनाच्या प्रवेशद्वारावर फलक चिकटविले. या प्रकारामुळे सिडकोत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.महाराष्ट्र भवनसाठी सिडकोने वाशी येथे दोन एकर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित ठेवला आहे; परंतु मागील १५ वर्षांपासून या भूखंडावर महाराष्ट्र भवनची निर्मिती करण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, याच परिसरात विविध राज्यांची भवन उभारली आहेत. मग महाराष्ट्र भवनचे वावडे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावर तीन महिन्यांपासून मनसेचा सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे. अलीकडेच या आरक्षित भूखंडावर लावण्यात आलेला महाराष्ट्र भवनचा फलक गायब झाला आहे. त्यामुळे हा भूखंड बिल्डराच्या घशात घालण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.गुरुवारी मनसैनिकांनी सिडको कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. तसेच व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनाला आपल्या मागणीचे फलक चिकटविले.या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे, संदीप गलुगडे, नीलेश बाणखेले, श्रीकांत माने, नितीन चव्हाण, स्वप्निल गाडगे, राजेंद्र खाडे आदीसह मनसे कार्यकर्त्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र भवनच्या प्रश्नावर मनसेचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:59 AM