जेएनपीटीवर धडकणार मनसेचे इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:52 AM2018-12-18T03:52:15+5:302018-12-18T03:52:32+5:30
विकासकामांचा जाब विचारणार : नोकरीत स्थानिकांना डावलले जात असल्याने संताप
उरण : जेएनपीटीच्या अनेक समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी बुधवार, १९ डिसेंबर रोजी मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत, संदीप देशपांडे व सीएचए कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष धुरी आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते जेएनपीटीवर धडकणार आहेत.
मध्यंतरी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे जेएनपीटीत येणार होते, त्यावेळी चेअरमन नीरज बन्सल यांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने ऐनवेळी दौरा रद्द करावा लागला होता. जेएनपीटी प्रकल्पात सुरू असलेल्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. परप्रांतीयांची भरती करून स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात आहे. त्याचबरोबर जेएनपीटी बंदरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डीपीडी धोरणामुळे या ठिकाणच्या सुमारे ३५ हजार सीएचए कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
त्याचबरोबर उरण तालुक्यात मागील दहा ते बारा वर्षांचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी रस्ता अपघातात सुमारे ८५० पेक्षा जास्त तरुण मृत्युमुखी पडले आहेत. यातील बहुतांशी तरु णांचा मृत्यू हा त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने झाला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अद्ययावत रु ग्णालयाची गरज आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला जेएनपीटीच्या प्रशासनाला वेळ नसताना कोणत्याही नागरिकाने मागणी नसताना शिवस्मारकाच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आंदोलनात मनसे सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी केले आहे.