आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 1, 2023 10:19 PM2023-12-01T22:19:57+5:302023-12-01T22:20:05+5:30

आंदोलन प्रकरणी वाशी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. 

MNS entered the exhibition not shops for marathi boaards | आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य

आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य

नवी मुंबई : आस्थापनांवर मराठी पाट्यांच्या आडून मनसे ठराविक घटकावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. आस्थापन व चार दिवसांचे प्रदर्शन यातला फरक माहित नसलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बिल्डर्स असोसिएशनच्या मालमत्ता प्रदर्शनात मराठी प्रेमाचे प्रदर्शन घडवले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. 

आस्थापनांवरील मराठी पाट्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्य व्यक्त करताच नवी मुंबई महापालिकेने देखील आस्थापनांवर मराठीत पाट्या लावण्याचे आदेश काढले आहेत. परंतु अद्यापही शहरातील बहुतांश आस्थापनांवर इंग्रजीतच पाट्या झळकत आहेत. असे असतानाही नवी मुंबई मनसेकडून मॉल, बिल्डर यांनाच धारेवर धरून मराठी प्रेमाचे प्रदर्शन घडवले जात आहे. वाशी येथे शुक्रवारपासून मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामध्ये विकासकांनी त्यांच्या गृह प्रकल्पांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत.

चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी घुसून आस्थापनांवर मराठी पाटी सक्तीची असल्याचे सांगत प्रदर्शनातील पाट्या देखील मराठीत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, विनोद पाखरे, इस्माईल शेख, जोगेंद्र जयस्वाल व शिवकुमार केवट उपस्थित होते. नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी आस्थापनांवर इंग्रजीत पाट्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून केवळ विकासकांच्या प्रदर्शनात घुसून मनसैनिकांनी केलेले प्रदर्शन मराठी कि लक्ष्मी प्रेम असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना आस्थापना व प्रदर्शन यातील फरक सांगितला. शिवाय विकासकांनी सहकार्यांची भूमिका घेत त्यांच्याविरोधात तक्रार केली नाही. दरम्यान आंदोलन प्रकरणी वाशी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. 

Web Title: MNS entered the exhibition not shops for marathi boaards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे