नवी मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गतमहिन्यात मनसेच्या तिघा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परंतु २१ दिवसांतच त्यांनी पुन्हा घरवापसीला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकारावरून नवी मुंबई मनसेत गटबाजीला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
सत्ताधारी व प्रशासन यांच्या विरोधात आंदोलने करून मनसेने मागील काही वर्षांत नवी मुंबईत विरोधी पक्षाचे स्थान मिळवले आहे. त्याआधारे वाढत्या जनाधाराच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीतही मनसे आपले उमेदवार उतरवणार आहे. तशा प्रकारची अधिकृत घोषणाही पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. अशातच गतमहिन्यात मनसेच्या तिघा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामागे पक्षात उमेदवारीचे दावेदार म्हणून स्थान मिळाल्याच्या चर्चा होत्या.
मात्र, अवघ्या २१ दिवसांत पक्षांतर केलेल्या तिघांपैकी एकाने बुधवारी पुन्हा मनसेत घरवापसी केली. त्यांना मनसेत आणण्यासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन मनधरणी केली. त्यानंतर संबंधितांनी पुन्हा मनसेत येण्याचा निर्धार केला आहे; परंतु त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या जागी इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांना पूर्वपदावर स्थान मिळेल याबाबत साशंकता आहे. मात्र, या प्रकारामुळे नवी मुंबई मनसेत गटबाजीला खतपाणी मिळत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वीही मनसेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ लागल्याने मनसेत गटबाजीला प्रोत्साहन मिळून ऐन पालिका निवडणुकीत पक्षापुढील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.