नवी मुंबई- राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं असताना शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यात मशिदींमध्ये बेकायदेशीर भोंगे नाहीत. पण आज राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्येही पहाटे काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस' आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊतांच्या या टीकेला आता मनसेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघालेल्या संजय राऊत यांनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नये. संजय राऊतांच्या या सुपारीची चर्चा सर्वसामान्य लोकांसोबत शिवसैनिकांमध्ये ही आहे. सत्तेची झापड डोळ्यावर चढल्यामुळे संजय राऊतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि भूमिकेचा विसर पडला आहे, असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.
भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. याआधी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्यामागे भाजपाचाच हात आहे आणि आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे. हे भोंग्यांचं आंदोलन मनसेवरच उलटणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हिंदूंना मोठा फटका- संजय राऊत
मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा एवढा मोठा मुद्दा नव्हता. पण राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपाने त्यांचा वापर करुन घेतला आहे. त्यांच्या आंदोलनामुळे आज मशिदींसह हिंदू मंदिरांनाही पहाटे आपली काकड आरती करता आलेली नाही. तसंच अनेक हिंदू मंदिरांनीही लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पण इतक्या कमी कालावधीत परवानगी देणं पोलिसांनाही शक्य नाही. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी दररोज हजारो, लाखो भाविक भेट देत असतात अशा पवित्र हिंदू मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.