मनसेकडून 'गाजर विवाहा'चे आयोजन, चि. चौकीदार अन् चि.सौ.का. थापाबाईचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:16 PM2019-04-22T17:16:59+5:302019-04-22T17:17:04+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा गाजर विवाहसोहळा आयोजित करण्यात येत आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि गिरीश महाजन यांना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गाजर विवाह या संकल्पनेतून एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईतीलमनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी या लग्नाची पत्रिका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा गाजर विवाहसोहळा आयोजित करण्यात येत आहे. खोट्या आश्वासन कृपेने 29 एप्रिल रोजी 56 इंचाच्या मुहूर्तावर हा सोहळा होणार असून जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील, असे म्हणत भाजपाच्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
भाजप-सेना सरकारने खोट्या घोषणा, खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. भाजप सरकार हे शेतकरी, आदिवासी व गोरगरिबांच्या विरोधातील आहे. म्हणून नवी मुंबई मनसैनिकांनी भाजप सेनेला कोपरखळी काढण्यासाठी हा गाजर विवाह सोहळा आयोजित केल्याचे गजाजन काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही गजानन काळे यांनी राजनाथसिंह यांना पत्र पाठवून शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसण्याची संधी द्यावी, असे म्हणत तावडे यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर, आता चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही खिल्ली उडवली आहे.
*कोपरखळी😜😅
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 22, 2019
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित *चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई* ह्यांचा गाजर विवाह* सोहळा खोटया आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी *५६ इंचाच्या* मुहूर्तावर होणार असून जॅकेटवाला फुगा,विनोदी मंत्री,पिस्तुलधारी गिऱ्या* हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील. pic.twitter.com/CjWfgznxK1