"मी भाषण केलं, पण मला गुन्हा मान्य नाही", राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 01:10 PM2021-02-06T13:10:11+5:302021-02-06T13:36:13+5:30
Raj Thackeray granted bail : वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
नवी मुंबई : वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वाशी न्यायालयानेराज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच, याप्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार असून या सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याची आवश्यता नाही.
या खटल्यात सुनावणीला सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर झाले. यावेळी वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी सुनावणीदरम्यान मी भाषण केले आहे, मात्र मला गुन्हा मान्य नाही, असे राज ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांना पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात २६ जानेवारी २०१४ ला राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी राज्यभरातील टोल वसुलीबाबत संताप व्यक्त केला होता. या वेळी टोलविरोधात त्यांनी भडकावू भाषण केल्यानंतर सभा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व साथीदारांवर गुन्हे दाखल करून अटक झाली होती.
तर भडकावू भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरदेखील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे २०१८ मध्ये देखील न्यायालयाने त्यांना समन्स काढले होते. मात्र २८ जानेवारीला ते समन्स संपल्याने त्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे प्रत्यक्ष सीबीडी येथील वाशी न्यायालयात हजर राहिले होते.