Raj Thackeray: महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय ते सर्व आपले पूर्वज - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:50 PM2023-02-27T12:50:46+5:302023-02-27T12:51:02+5:30
marathi bhasha din: आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे.
नवी मुंबई : आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आई वडिलांकडील नातेवाईक हेच केवळ आपले पूर्वज नसून महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, जे झटले आहेत ते आपले पूर्वज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून लक्ष वेधले.
दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी झटलेल्या लोकांचे योगदान समजून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण कवी कुसुमाग्रज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषांचे कार्य नीट समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज समजून घेण्याआधी राजमाता जिजाऊंचे संस्कार वाचा तेव्हाच शिवाजी महाराज कळतील. कारण आताच्या पिढीला वाचणाची नितांत आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
दादा कोंडकेंचे 'एकटा जीव' आवडीचे पुस्तक
पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक देखील सांगितले. "खरंतर बरीच पुस्तके खूप जवळची आहेत. पण दादा कोंडके यांच्यावरचे 'एकटा जीव' हे पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येते. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता", असे राज ठाकरे म्हणाले.
फिक्शन, लव्हस्टोरी वाचत नाही
फिक्शन आणि लव्हस्टोरी अशी पुस्तके मी काही वाचत नाही. दुसरा प्रेम करतोय ते आपण काय वाचायचे. त्याचे तो बघेल ना, असे म्हणत राज ठाकरे यांनी फिक्शन, लव्हस्टोरी वाचण्यात अजिबात रस नसल्याचे म्हटले. पूर्वीचे लेखक समाज कसा शहाणा होईल यासाठी लिहायचे, पण आताचे लेखक आपण किती शहाणे आहोत ते दाखवण्यसाठी लिहितात, असेही राज ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"