उरण येथील यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील घटना आणि महिलांवरील अत्याचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे य़ांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे य़ांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
"शक्ती कायदा पास करावा अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे" असं देखील शर्मिला ठाकरे य़ांनी म्हटलं आहे. "पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. तरी सुद्धा जर त्यांनी एक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितली आहे. ही तुमची जबाबदारी असल्याचं सांगितलं. सर्व मुलींच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. कोणताच पक्ष तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा."
"गेल्या तीन दिवसांत तीन मुली... किती हिंस्त्रपणा. निर्भया प्रकरणात १६ वर्षांचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलांमध्ये विकृती आहे त्यांना फाशी द्या. या लोकांवर पोलिसांची दहशत असली पाहिजे. पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. शक्ती कायदा पास करावा अशी पंतप्रधानांना विनंती आहे. असे गुन्हे झाले की त्यांना फाशीच झाली पाहिजे" असं माध्यमांना प्रतिक्रिया देताना शर्मिला ठाकरे य़ांनी म्हटलं आहे.
उरण येथे राहणारी २० वर्षीय यशश्री शिंदे गुरुवारी बेपत्ता झाली होती. तिचा शोध पोलिसांकडून सुरू होताच त्यातच शुक्रवारी रात्री उशीरा एका पेट्रोल पंपाजवळील निर्जनस्थळी तरुणीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्रीचा असल्याचं निष्पन्न झालं. या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती. शरीरावर अनेक वार केले होते. तिचा निर्घृण खून केल्याचं उघड झालं.