नवी मुंबई: ठेकेदारांकडून कामात हलगर्जी, अनियमितता असे प्रकार घडत असतानाही प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ मनसेने शहर अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी १५ दिवसात चौकशी करून दोषींवर ठोस कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी दालनातून काढता पाय घेतला. सीवूड येथे महापालिकेकडून चौकाचे व रस्त्याचे काम सुरु आहे. दरम्यान या कामात निष्काळजीपणा होत असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तर रस्त्याचे काम करताना चांगल्या स्थितीतल्या रस्त्यावरच डांबराचा थर टाकला जात आहे. यावरून मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी बुधवारी त्याठिकाणी धडक देऊन अधिकारी व ठेकेदार यांना धारेवर धरले होते.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी कामात अनियमितता, हलगर्जी झाल्याच्या कारणावरून ज्या ठेकेदाराला दोनदा नोटीस बजावली आहे. त्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याचेही आश्चर्य काळे यांनी व्यक्त केले आहे. अशातच ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली येथील पुलावर सुरु असलेल्या कामादरम्यान निष्काळजीमुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. या ठेकेदाराला देखील प्रशासन पाठीशी घालत असल्याचा मसनेचा आरोप आहे.
त्यावरून गुरुवारी थेट महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्याच दालनात ठिय्या घालण्यात आला. यावेळी काळे यांनी देसाई यांना धारेवर धरत जे ठेकेदार अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत त्यांच्यावरच प्रशासन मेहेरबान का होत आहे याचाही जाब विचारला. अखेर संबंधित कामांची व ठेकेदारांची चौकशी करून १५ दिवसात ठोस कारवाईचे आश्वासन शहर अभियंता देसाई यांनी दिल्यानंतर मनसैनिकांनी दालनातून काढता पाय घेतला.