लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोच्या उलवे, बामणडोंगरी येथील घरांच्या किमती जास्त असल्याने पात्र ठरवूनही १३०० सोडतधारकांनी घरे परत केली होती. मात्र नुकतेच सिडकोने या घरांच्या किमती सुमारे सहा लाखाने कमी केल्याने ३५ लाखाचे घर सुमारे २८ ते २९ लाखात मिळणार आहे. त्यामुळे यापूर्वी घर नाकारलेल्याना दलालांमार्फत संपर्क साधला जात असून अडीच ते तीन लाखाची दलाली मागितली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
उलवे व बामणडोंगरी येथील ७८४९ घरांसाठी सिडकोने दोन वर्षांपूर्वी सोडत काढली होती. मात्र घरांचे क्षेत्रफळ, भवतालच्या सुविधा यांच्या तुलनेत सिडकोने घरांसाठी ठरवलेले ३५ लाखाचे मूल्य अधिक असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. परंतु सिडकोकडून दखल घेतली जात नसल्याने सुमारे १३०० लाभार्थींनी पात्र ठरवूनही घर नाकारले होते. तर उर्वरित लाभार्थींनी घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. दरम्यान मनसेने त्यांना साथ देत सिडको विरोधात मोहीम उभारली होती. तसेच शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोसाठी भीक मागो आंदोलन देखील केले होते. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नागरिकांची व्यथा मांडली होती.
अखेर सिडकोने या घरांच्या किमती सुमारे ६ लक्षणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये किंमत जास्त असल्याने घर नाकारणाऱ्या १३०० लाभार्थ्यांपैकी देखील अनेकांनी पुन्हा घर मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांना दलाला संपर्क साधत असून पुन्हा घर मिळवण्यासाठी अडीच ते तीन लाखाची मागणी करत असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. यामागे सिडकोचे काही अधिकारी असल्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र कोणत्याही अडथळ्याविना या लाभार्थ्यांनाही घरे देण्यात यावी, तसेच पुन्हा दलालांनी कोणाला संपर्क केल्यास त्याला चोप देण्यात येईल असा इशारा काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तसेच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्या हस्ते वाटपपत्र द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. याप्रसंगी सविनय म्हात्रे, सचिन कदम, विलास घोणे, दिनेश पाटील, श्रीकांत माने, आरती धुमाळ, भूषण कोळी, संदीप गलुगडे, सनप्रीत तुर्मेकर आदी उपस्थित होते.