नवी मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आमदार राजू पाटील यांनी दिले आहेत. नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा उद्घाटन सोहळा रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास आमदार राजू पाटील, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आदी उपस्थित होते. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत आमदार राजू पाटील यांनी दिले. त्यासाठी आपण नवी मुंबईत ठाण मांडून राहणार असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या पाहून अनेक प्रभागांत पक्षाच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रिंगणात उतरण्यास इच्छुक असणाऱ्या मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सत्तेत येतो, तो माज करतोराज्य सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा कमी केला आहे. त्यावरून मनसैनिकांमध्ये नाराजी आहे, परंतु जो सत्तेत येतो, तो माज करतो, अशी टीका पाटील यांनी केली आहे. हा ट्रेंड पूर्वीपासून सुरू असून, सत्तेचा गैरवापर होत असल्याचेही ते म्हणाले.