नवी मुंबई : सिडकोने उलवे व बामनडोंगरी येथे उभारलेल्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती कमी करण्याची मागणी मनसेकडून होत आहे. याबाबत सिडकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी सिडको विरोधात भीक मागा आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसह सिडकोच्या सोडतीत पात्र ठरलेल्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
सिडको प्रकल्पातील घरांच्या किमतीवरून सातत्याने प्रश्न उठत असतात. त्यातच उलवे व बामन डोंगरी येथील प्रकल्पात क्षेत्रफळाच्या तुलनेत घरांच्या किमती अधिक असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून होत आहे. शिवाय प्रकल्पात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत व अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे असताना देखील घरांच्या किंमती ३५ लाखांच्या घरात ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घरे जात असल्याची तक्रार अर्जदार, लाभार्थी यांनी मनसेकडे केली होती. त्याद्वारे मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेतली होती. मात्र सिडकोकडून त्याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी मनसेच्या वतीने सीवूड येथे भीक मागा आंदोलन करण्यात आले.
भीक मागून जमा झालेला निधी सिडकोला दिला जाणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. सीवूड्स येथील ग्रँड सेंट्रल मॉल ते सीवूड्स डीमार्ट पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये पादचारी, दुकानदार यांच्याकडून सिडकोसाठी भीक मागण्यात आली. या मोर्चात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सिडको सदनिकांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतरही सिडकोने घरांच्या किमती कमी न केल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुक्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याचा प्रत्यन केला जाणार असल्याचेही काळे यांनी सांगितले.