मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 12, 2024 07:32 PM2024-02-12T19:32:16+5:302024-02-12T19:32:25+5:30
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती.
नवी मुंबई : पालिका अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावण्याचे वक्तव्य करत कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका अभियंत्यांच्या तक्रारीवरून एनआरआय पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. यावेळी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या निष्काळजीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप करत काळे यांनी ठेकेदार, पालिका अधिकारी यांना अपशब्द वापरला होता. परिणामी ८ फेब्रुवारीला ठेकेदारांनी मनसेच्या सीवूड येथील कार्यालयाला घेराव घालून काळे यांच्या वक्तव्याचा निषेध देखील व्यक्त केला होता. त्यावेळी काळे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतले होते.
काळे यांच्या विरोधात पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये आपण कामाच्या ठिकाणी पाहणी करत असताना गजानन काळे, अमोल आयवले यांनी त्याठिकाणी येऊन कामात अडथळा केला, उठाबशा काढण्याचे वक्तव्य करून अपमान केला अशी तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री गजानन काळे, अमोल आयवले यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.