सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पात नोंदणीसाठी मोबाइल अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:26 AM2018-09-11T02:26:16+5:302018-09-11T02:26:21+5:30
गेल्या महिन्यात सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मेगा गृहप्रकल्पातील घरासाठी अर्ज करणे आता अधिक सुलभ होणार आहे.
नवी मुंबई : गेल्या महिन्यात सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मेगा गृहप्रकल्पातील घरासाठी अर्ज करणे आता अधिक सुलभ होणार आहे. अर्ज भरताना नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन सिडकोने मोबाइल अॅप तयार केले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी या अॅपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर व सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.
सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी १४,८३८ घरांच्या मेगा गृहप्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. १३ आॅगस्ट २0१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, तर १५ आॅगस्टपासून या घरांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. सिडकोने पहिल्यांदाच घरासाठी आॅनलाइन अर्ज मागविल्याने नागरिकांत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. सायबर कॅफे किंवा तत्सम ठिकाणी जाऊन अर्ज भरावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची धावपळ होत आहे. नागरिकांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, यादृष्टीने सिडकोने या योजनेसाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. सिडको आॅनलाइन २0१८ असे या अॅपचे नाव असून त्याद्वारे स्वत:चा फोटो काढणे, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा धनादेशाची माहिती स्कॅन करून अपलोड करणे शक्य होणार आहे.
या अॅपमुळे घरासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.