सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्रत्यक्षात शाळा न भरता ऑनलाइन सुरू आहेत. परिणामी लहान मुलांचा अधिकाधिक वेळ मोबाइलवर जात आहे. यामुळे अनेकांचे मानसिक व शारीरीक स्वास्थ्य खालावू लागले आहे. आजवर लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा सांगणाऱ्या पालकांनाच मुलांच्या हाती मोबाइल द्यायची वेळ आली आहे. त्यास काही प्रमाणात ऑनलाइन क्लास कारणीभूत ठरले आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने प्रायमरीच्या मुलांचेही ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. यादरम्यान मुलांनी मोबाइल अथवा संगणकासमोर बसावे यासाठी त्यांना त्याची सवय लावली जात आहे. परिणामी मुलांना स्मार्टफोनचा लळा लागल्याने मैदानात जाऊन खेळण्याकडे दुर्लक्ष होत आहे, तर एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठी पालकांकडूनदेखील मुलांना घराबाहेर पाठवण्यास चालढकल होत आहे. त्यामुळे पुढील काळात मुलांना लागलेली मोबाइलची सवय तोडणे, हेदेखील पालकांना आव्हानात्मक ठरणार आहे. सतत मोबाइलमध्ये डोकावल्याने मुलांच्या डोळ्यांवर तर परिणाम होतच आहे. शिवाय अनेकांची झोपदेखील कमी झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर उमटत आहे.लिखाणाचा विसरशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक लिखाण होत असते. शिवाय त्यांची पाठांतर शक्ती वाढत असते. परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे केवळ स्मार्टफोनवर व्हिडिओ बघण्यातच मुलांचा अधिक वेळ जात आहे. यामुळे मुलांची लिखाणाची सवय तुटत चालली आहे. त्यांना पुन्हा लिखाणाकडे वळवायचे असल्यास शाळा हाच उत्तम पर्याय आहे.
मुले कायम मोबाइलवरऑनलाइन शिक्षणाच्या बहाण्याने प्रायमरी शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मुलांच्या परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जात आहेत. त्यात अवघी काहीच मुले शिक्षकांच्या दृष्टीस पडत असल्याने इतर मुले दुर्लक्षित राहत आहेत. अशा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन शिक्षणच बरे अशी भावना अनेक पालकांची आहे.
कोरोनामुळे मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढले कोरोनामुळे शहरातील उद्याने व मैदाने खेळासाठी बंद आहेत. परिणामी लहान मुलांना घरातच मोबाइलवर वेळ काढावा लागत आहे. अशावेळी त्यांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी पालकांना मुलांच्या हाती मोबाइल द्यावा लागत आहे. यामुळे त्यांना वेगवेगळ्या गेमची प्रमाणाबाहेर आवड निर्माण झाली आहे.