तुर्भे स्थानकात मोबाइल चोराला रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:27 AM2018-07-11T02:27:41+5:302018-07-11T02:27:52+5:30
रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला.
नवी मुंबई - रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला. या वेळी महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करून पकडले.
नौशाद अली शेख (१९) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो तुर्भे स्टोअरचा राहणारा आहे. सोमवारी संध्याकाळी कोपरखैरणे येथे राहणाºया सुनीता धनावडे ठाणे लोकलने कोपरखैरणेकडे चालल्या होत्या. त्यांची लोकल तुर्भे स्थानकात आली असता, दबा धरून बसलेल्या शेख याने त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. या वेळी धनावडे यांनी आरडाओरडा देखील केला, परंतु काही प्रवाशांनी त्याचा पाठलाग करून देखील चोरटा त्यांच्या हाती लागला नाही. याचवेळी रेल्वेस्थानकात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे नंदलाला यादव, नीलेश दळवी, विनेत कुमार यांनीही सदर महिलेचा आवाज ऐकला. यानुसार त्यांनी चोर पळालेल्या दिशेने रेल्वेस्थानकाबाहेर धाव घेतली.
या वेळी स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत थांबून चोरलेला मोबाइल हाताळताना नौशाद अली शेख याला पकडण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले. त्याच्याकडून धनावडे यांचा चोरीला गेलेला १२ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. शेख हा सराईत गुन्हेगार असून अधिक चौकशीसाठी त्याला वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.